* नातेवाईक आणि समर्थकांचा कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
* पक्षनेते आदित्य ठाकरे, खा.संजय राऊत पोलीस ठाण्यात, शिंदे गटावर टीका
* मानपाड्यात तणाव, पोलीस बंदोबस्त वाढवला
ठाणे: मानपाड्यातील गणेशनगर चर्चजवळ ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर (३७) यांची गोळ्या झाडून तसेच धारदार शस्त्राने वार करून मंगळवारी रात्री हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका घेत नातेवाईक आणि समर्थकांनी कापुरबावडी पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. तर पोलीस ठाण्यात उपस्थित पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि खा.संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुरवणी एफआयआरमध्ये शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे टाकण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
ही हत्या राजकीय व सामाजिक कारणातून पूर्वनियोजित कट रचून केल्याचा आरोप पूर्णेकर यांचे नातेवाईक मंदार घोडके यांनी कापूरबावडी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत केला आहे. पूर्णेकर यांचे आर मॉलजवळील गणेशनगर चर्चजवळ कार्यालय असून तेथे नागरिकांची नेहमी ये-जा असते. काल रात्री ९.३०च्या दरम्यान पूर्णेकर कार्यालयात असताना त्यांचा पूर्वीचा सहकारी पप्या शिंदे तेथे आला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिंदे हा पूर्णेकर यांच्या विरोधात गेला होता, असा उल्लेख फिर्यादीत आहे.
मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घोडके आणि त्यांचा मित्र राहुल जैस्वाल हे पूर्णेकर यांच्या कार्यालयात चर्चा करीत असताना पप्या शिंदे तेथे आला. त्यावेळी दोघांनी बाहेर जाण्याचा इशारा केल्याने घोडके व जैस्वाल कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी निखिल यादव ऊर्फ शुटर यादव, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली, चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधलेला काळ्या कपड्यातील एक व्यक्ती आणि काळे हेल्मेट घातलेला आणखी एक जण कार्यालयाकडे जाताना दिसले. काही वेळातच कार्यालयाच्या दिशेने सलग पाच ते सात गोळ्या झाडल्यासारखे आवाज ऐकू आले. घोडके आणि जैस्वाल यांनी कार्यालयाकडे धाव घेतली असता पूर्णेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. पप्या शिंदे त्यांना पकडून असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पूर्णेकर यांना कार्यालयाबाहेर आणून डॉक्टरांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून आर मॉलजवळील इन्फिनिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
पूर्णेकर यांच्या शरीराच्या पुढील व मागील बाजूस धारदार शस्त्राने वार झाल्याच्या जखमा तसेच मानेच्या दोन्ही बाजूंना आणि उजव्या दंडावर जखमा आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, गोळीबारानंतर संतोष कनोजिया आणि चेहऱ्यावर रुमाल बांधलेला इसम पांढऱ्या अॅक्सिस दुचाकीवरून पसार झाल्याचे, तर निखिल यादव आणि हेल्मेटधारी व्यक्ती कार्यालयातून पळून गेल्याचे घोडके यांनी पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी पप्या शिंदे, संतोष ऊर्फ टल्ली कनोजिया, निखिल यादव ऊर्फ शुटर यादव, चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधलेला इसम आणि हेल्मेटधारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध संगनमत करून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलिसांनी तपास सुरू केला असून, हत्येमागील नेमके कारण, गोळीबारात वापरलेले शस्त्र आणि आरोपींची भूमिका याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे या भागातील वातावरण तंग झाले होते मानपाड्यातील मनोरमानगर, गणेशनगर परिसरातील दुकाने आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिवसभर त्या परिसरात शुकशुकाट दिसून आला.
बुधवारी दुपारी पूर्णेकर यांच्या नातेवाईकांसह त्यांच्या समर्थकांनी मानपाडा गणेशनगर येथून मोर्चा कापूरबावडी पोलिस ठाण्यावर काढण्यात आला. पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी नऊ पथके तयार केली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्वच बाजूंनी चौकशी करत आहोत. फरार आरोपींच्या मागावर ९ ते १० पथके रवाना करण्यात आली आहेत. याशिवाय परिस्थितीनुसार चोख बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
एफआयआरमध्ये मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे यांची नावे
माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे पुरवणी एफआयआरमध्ये टाकून त्यांची चौकशी करण्याची मागणी मान्य झाल्यानंतर कापुरबावडी पोलिस ठाण्यासमोरील आंदोलन मागे घेण्यात आले.
विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे आणि इतर आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन सुरु केले होते. शिवसेनेचे युवा नेते आ. आदित्य ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्यसह माजी खा. राजन विचारे आणि ठाण्यातील उबाठा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुमारे अर्धा तास आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पोलिस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याबरोबर बैठक घेतली. या प्रकरणात शिंदे दाम्पत्याची नावे पुरवणी एफआयआरमध्ये टाकून त्यांना अटक करून चौकशी केली जात नाही तोपर्यंत कोणीही येथून हटणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. अखेर पोलिसांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर आरोप केले. पालकमंत्री यांच्यावर देखिल आरोप करण्यात आले असून त्यांच्या दबावामुळे आरोपींची नावे टाकण्यात आली नव्हती, असा आरोप राऊत यांनी केला. बुधवारी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या घरी मारेकरी गेले होते, राजेंद्र शिंदे यांच्याबरोबर निळकंठ येथे आरोपीबरोबर बैठक झाली. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी हे पाहिले असून ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलरला पैसे देऊन केली आहे.
या हत्येशी आमचा काडीमात्र संबंध नसून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. या गुन्ह्यांची सखोल चौकशी पोलिस करत असून त्यामधून खरी माहिती समोर येईल. पोलिसांनी चौकशीकरिता बोलावले तर त्यांना सहकार्य करू.